ओतूर -करोनाच्या पार्श्वभूमीवर ओतूर बंदच्या केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ व व्यावसायिक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; मात्र काही व्यावसायिक अद्यापही व्यवसाय बंद न ठेवता नियमांची पायमल्ली करत असल्यामुळे अशा व्यक्तींवर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
दहा दिवसांपासून ओतूर व परिसरात करोनाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे नागरिक व प्रशासनामधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच बाजार समितीच्या ओतूर उपबाजार आवारातील दोन आडतदार बंधूंना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे आहे. त्यामुळे गाव व व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने येथील सरपंचासह सदस्यांचा कार्यकाळ संपला. निर्णय कोणी व कसा घ्यायचा याबाबत संभ्रमावस्था होती.
मात्र पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मोहित ढमाले व जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे यांनी या ओतूर बंद संदर्भात व करोना कोविडची साखळी तुटण्यासाठी गावातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येण्यापेक्षा ओतूरमधील सर्व पत्रकार मित्रांनी पुढे येऊन प्रशासनाच्या मदतीने ही साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती वजा सूचना केली. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, व्यापारी असोसिएशन व ओतूर शहर पत्रकार संघ यांच्या वतीने ग्रामस्थ व व्यावसायिकांना ओतूर बंदचे आवाहन केले.
मात्र महामार्गावर मांडवी नदीच्या पुलानजीक काही हुंडेकरी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेवल्याचे जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत तात्काळ ओतूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 50 दुकानांवर कारवाई केली आहे. मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे आदी प्रकारचे 160 गुन्हे दाखल करून, 350 जणांना दंड केला आहे.