‘मास्क’ लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार असून विरोधकांनी महाविकास आघाडीला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पुर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर “मास्क” लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे, असाही निशाणा शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे.

दरम्यान, न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी सीबीआयसमोर मांडाव्यात असे स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.