पुणे : सिग्नल सुटल्यानंतर डंपरच्यापुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वाराची डंपरला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता.४) सकाळी सव्वा अकरा वाजता येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात घडली.
अख्तर शेख (वय ६०) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर शेख हा गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून कारागृह रस्त्यावरून गुंजन चौकाच्या दिशेने जात होता.
गोल्फ क्लब चौकात सिग्नल सुटल्यानंतर शेख याने डंपरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डंपरची धडक बसल्याने शेख खाली पडला, डंपरचे चाक पायावरून गेल्याने शेख गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर त्यास उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.