नगरच्या इतिहासप्रेमीने तयार केली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती
नगर – छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती येथील इतिहासप्रेमी छायाचित्रकार ठाकूरदास परदेशी यांनी सारसनगर परिसरातील आपल्या घरी साकारली असून, ती पाहण्यासाठी इतिहासप्रेमींची गर्दी होत आहे. या निमित्ताने त्यांनी काही ऐतिहासिक वस्तूंचेही प्रदर्शनही भरवले आहे.
येथील पंडित नेहरू हिंदी विद्यालयातील कनिष्ठ लिपिक असलेले ठाकूरदास परदेशी हे इतिहासप्रेमी असून, सुट्टीच्या दिवशी ते दुर्गभ्रमंती करतात. मागील वर्षांत त्यांनी गड-किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. याच इतिहासप्रेमापोटी दरवर्षी दिवाळीत स्वतःच्या घरी ऐतिहासिक किल्ल्याची ते प्रतिकृती साकारतात.
तोरणा, राजगड, शिवनेरी, पुरंदर, प्रतापगड असे विविध किल्ले आतापर्यंत त्यांनी साकारले आहेत. यंदा त्यांनी बाय फूट आकारात सिंधुदुर्ग हा जलदूर्ग तयार केला आहे. समवेत त्या किल्ल्यात घडलेला इतिहास व किल्ल्याविषयीची सविस्तर माहिती देणारी ऑडिओ क्लीपही किल्ला पाहताना ऐकवली जाते. येत्या नोव्हेंबरपर्यंत हा किल्ला पाहण्यासाठी त्यांनी मोफत खुला ठेवला असल्याने इतिहासप्रेमी आवर्जून त्यांच्या घरी येत आहेत व त्यांच्या इतिहासप्रेमाला व शिल्पकला कौशल्याला दाद देत आहेत.
या किल्ल्या बरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर निघालेले पोस्टाचे तिकीट, गडकिल्ल्यांवर निघालेले पोस्टाचे पाकीट, शिवकाळातील नाणे असलेली शिवराई व होन यांच्या प्रतिकृती, मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर निघालेले रुपयांचे नाणे अशा अनेकविध ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शनही भरविलेले आहे.
परदेशी यांचा उपक्रम प्रेरणादायी
इतिहासप्रेमी ठाकूरदास परदेशी यांनी आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरु केलेला उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत नगरसेवक गणेश भोसले यांनी व्यक्त केले. नगरसेवक भोसले यांच्यासह माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी परदेशी यांच्या निवासस्थानी जावून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली. तसेच इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी आवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.