ईडन गार्डनवर घडणार इतिहास

भारतीय क्रिकेटमध्ये लवकरच एक इतिहास घडणार आहे. कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर भारतीय संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. खरेतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ज्या ज्या गोष्टींना सुरुवातीला नकार दिला, त्याच गोष्टी मंडळाने नंतर मान्य केल्या. केवळ मान्यच केल्या असे नाही तर त्यात यश देखील मिळविले.

जेव्हा मैदानावरील पंचांच्या निर्णयावर दाद मागण्यासाठी डीआरएस प्रणाली सुरू झाली त्यावेळी मंडळाने चेंडूत काय जीपीआरएस आहे का, अशी विचारणा करत ही प्रणाली फेटाळून लावली, मात्र विराट कोहली कर्णधार झाला आणि पुर्वी ही प्रणाली न स्वीकारल्याने जे नुकसान झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी ही प्रणाली स्वीकारली. त्यानंतर उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती मग ती आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय त्याच्या कक्षेखाली येण्यास देखील मंडळाने सातत्याने नकार दिला. त्यातील “व्हेअर टू नो’ या नियमामुळे दिग्गज खेळाडूंची सुरक्षा धोक्‍यात येईल असे कारण दिले. मात्र जेव्हा परिषदेच्या स्पर्धांमध्ये काही खेळाडूंनी बंदी असलेले औषध घेतले व त्यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी मात्र मंडळाने या समितीच्या कक्षेत येण्याचा निर्णय घेतला.

आता देखील गेली तीन चार वर्षे दिवस-रात्र कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियासह काही देशांनी भारतीय मंडळाला विनंती केली तेव्हा देखील मंडळाने नकार कायम ठेवला. मात्र यावेळी भारतीय मंडळात बदल घडला आणि माजी कर्णधार तसेच बेधडक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीने मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मात्र त्याने पहिल्या फटक्‍यात दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दाखविली व लगेचच असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना या पद्धतीने खेळण्यासाठी बांगलादेश मंडळाकडूनही होकार मिळविला. अर्थात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या देशांची क्रिकेट मंडळे फारशी श्रीमंत नाहीत आणि भारतीय मंडळ जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून ओळखले जाते, त्यामुळे ज्या सामन्यात तसेच स्पर्धेत भारतीय संघ खेळतो त्यात प्रतिस्पर्धी संघांचे देखील उखळ पांढरे होते. त्यामुळे बांगलादेश मंडळाने नकार देण्याचा प्रश्‍नच येणार नव्हता.

ही झाली पार्श्‍वभूमी, मात्र तसे पाहयला गेले तर या सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला जाणार आहे. येत्या 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ईडन गार्डनवर रंगणाऱ्या सामन्याद्वारे हा क्षण क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नामवंत क्रिकेटपटू तसेच विविध खेळांतील प्रतिष्ठित खेळाडू देखील या सामन्याला उपस्थित राहणार असून बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे त्यांना गौरविण्यातही येणार आहे.
1996 च्या उपांत्य फेरीतील श्रीलंकेविरुद्ध भारताचा दारुण पराभव झालेल्या सामन्याचा अपवाद वगळता या मैदानावर भारतीय संघाने सरस कामगिरीचे अनेक दाखले दिले आहेत.

ऐतिहासिक ईडन गार्डनवर आतापर्यंत दोन विश्‍वचषक स्पर्धांचे अंतिम सामने (1987 आणि टी-20, 2016) खेळविले गेले आहेत. तसेच अनेक संस्मरणीय किसोटी लढतीचे देखील हे मैदान साक्षीदार आहे. दोन वेळा आयपीएल (इडियन प्रीमिअर लीग) चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचे घरचे मैदान आहे. या मैदानाच्या इतिहासात लवकरच आणखी एक सोनेरी पान जोडले जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळविल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे. सौरव गांगुलीने कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यावर त्याची सहमती घेत या सामन्याची अधिकृत घोषणा केली. भारतासाठी दिवस-रात्र सामना नवीन असला तरी ऑस्ट्रेलियाकडून दरवर्षी गुलाबी चेंडूंवर खेळविल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर दरवर्षी भारतातही असे सामने आयोजित करण्याचे गांगुलीने निश्‍चित केले आहे.

ऑलिम्पिकपटूंना निमंत्रण
भारतात प्रथमच होत असलेल्या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेण्यासाठी देशाच्या ऑलिम्पिकपटूंना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात नेमबाज अभिनव बिंद्रा, मुष्टीयुद्ध खेळाडू मेरी कोम, फुलराणी पी. व्ही. सिंधू यांचा या सामन्या दरम्यान गौरव करण्यात येणार आहे. या महिन्यात भारत व बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. पहिली कसोटी 14 ते 18 नोव्हेंबर रोजी इंदूरला होणार असून दुसरी कसोटी 22 ते 26 या कालावधीत कोलकात्यातील ईडन गार्डनवर होणार आहे.

दव, नाणेफेक महत्त्वाची
या मैदानावर खेळपट्टीवर पडणारे दव, मैदानातील गवत (हिरवळ) आणि नाणेफेक या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहे. खेळपट्टीवर अधिक तर आणि प्लेईंग एरियात कमी गवत ठेवण्यात आले आहे. देशात प्रथमच होत असलेल्या दिवसरात्र कसोटीत दवाचा परिणाम निश्‍चितपणे जाणवणार आहे. खेळपट्टीवर जास्त उंचीचे गवत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण गुलाबी रंगाचा चेंडू लवकर खराब होतो. ऍडलेड येथे 2017 मध्ये पहिली दिवसरात्र कसोटी खेळली गेली तेव्हा तिथे खेळपट्टीवर 11 मिमी उंचीचे गवत ठेवण्यात आले होते. गवत जास्त ठेवले गेल्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा मिळेल. दुलीप करंडक स्पर्धेवेळी खेळपट्टीवर चेंडू लवकर खराब होत होता. त्यावेळी तिथे 7 मिमीचे गवत ठेवण्यात आले होते.

सर्वसाधारणपणे 2.5 ते 4 मिमीचे गवत ठेवले जाते. त्यामुळे जास्त गवत ठेवले तर वेगवान गोलंदाजांसाठी ते नंदनवन असेल. सर्वसाधारणपणे सभोवतालच्या मैदानावर 7 ते 8 मिमी गवत ठेवले जाते, पण प्रकाशझोतातील कसोटी असल्यामुळे या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करताना गवत 7 मिमीपर्यंत कापले जाणार आहे. ईडन गार्डनवरील मैदान हे क्षेत्ररक्षणासाठी उत्तम आहे. ईडन गार्डनवरील माती मऊ आहे. त्यामुळे जरी गवत कापले गेले तरी क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवताना दुखापत होण्याची शक्‍यता कमी आहे.

कोहलीच्या नावावर विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर या सामन्यामुळे एक अनोखा विक्रम नोंदला जाणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात देशात पहिल्यांदाच होत असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार म्हणून इतिहासात कोहलीचे नाव कोरले जाणार आहे. 1932 साली भारतीय संघाला कसोटी दर्जा बहाल करण्यात आला. त्यानंतर 20 वर्षांनी संघाने कसोटीतील पहिल्या विजयाची नोंद केली. अर्थात त्यावेळी भारतातील क्रिकेट बाल्यावस्थेत होते. त्यानंतर 31 वर्षांनी भारतीय संघाने 1983ची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली आणि तेथून भारतीय संघाचा प्रवास सामन्य तसेच पर्यटक असलेला संघ ही ओळख पुसली गेली. 90 च्या दशकात भारतीय संघाची कामगिरी उंचावत गेली आणि मंडळाकडे पैशांचा स्रोत नव्हे तर धबधबा सुरू झाला. या सगळ्या प्रगतीत आता दिवस-रात्र कसोटी सामन्याचे सुवर्णपान जोडले जाणार आहे.

आधी जेवण, मग चहापान
दिवसरात्र कसोटी सामना भारतात दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरू न होता एक तास आधीच सुरू होणार आहे. येथील वातावरण पाहता संध्याकाळनंतर मैदानावर जास्त प्रमाणात दव पडते, त्यामुळे आउटफिल्ड ओले होते, याचा त्रास दोन्ही संघांना होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कसोटीला दुपारी दीड वाजता प्ररंभ होईल, तसेच पहिले सेशन झाल्यावर चहापानाचा ब्रेक होईल. त्यानंतर दुसरे सेशन झाल्यावर 40 मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार असून तिसरे सेशन दीड तासांचे असून या सत्रात फ्लडलाईच्या प्रकाशात खेळ होईल. या सामन्यासाठी तिकिटांचे दर देखील सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक दिवसाच्या तिकिटाचे दर पन्नास रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच स्टॅंड, गॅलरी येथील दर अनुक्रमे 100 व 150 रुपये ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर शालेय विद्यार्थांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बंगाल संघटनेचा हा स्तुत्य निर्णय आहे.

अमित डोंगरे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.