महर्षीनगर (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे पुण्यातील सराफ बाजार मंदीत काळवंडला आहे. गेली सव्वा महिने ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया यासारख्या मुहुर्तावर उलाढाल झालीच नाही. सोने खरेदीसाठी शुभ मानला जाणार गुरुपुष्यामृताचा योगही साधता आला नाही. त्यामुळे आता बाजार दिवाळीलाच चमकणार, असा अंदाज सराफांकडून बांधला जात आहे.
लॉकडाऊनमुळे शहरातील लक्ष्मी रस्त्यासह उपनगरांतील छोटी-मोठी सराफांची दुकानेही बंद आहेत. सोने खरेदीसाठीचे दोन मुहूर्त आतापर्यंत विनाउलाढालीचे गेले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत लग्नसराई असल्याने या दोन महिन्यांत अनेक मुहूर्त निघत असतात. यानिमित्ताने होणारी सोने खरेदीही ठप्प आहे. लग्नासारख्या कार्यक्रमांना बंदी असल्याने लग्नही मोजक्या माणसांत उरकली जात आहेत.
यातून लग्नसराईचा मुहूर्तही हुकणार असल्याने सराफ बाजारपेठेला याची मोठी झळ बसणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सोने उद्योगावरच मोठा परिणाम झाला आहे. सोन्याच्या खाणींतील उत्पादन तसेच सोने गाळण्याची प्रक्रिया पूर्ण बंद आहे. अन्य देशांतून येणारे सोनेही बंद असल्याने खरेदी-विक्रीची कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने बाजारातील उलाढाल शून्यावर असल्याचे सराफांकडून सांगण्यात आले.
करोनामुळे कंपन्या तसेच मोठे उद्योग बंद असल्याने सोने खरेदीचा ग्राहक असलेला वर्ग कमी झाला
आहे. नोकरीची शाश्वती नसल्याने तसेच अन्य व्यापाऱ्यांनीही भांडवलासाठी पैसे राखून ठेवल्याने सोने खरेदीत गुंतवणुक करण्याची मानसिकता आता तरी कोणाची दिसत नाही.
आवश्यक गरजा पूर्ण करण्याकडेच सामान्य नागरिकांचा कल असल्याने याचा परिणाम दागिने खरेदीवर होत असल्याचे सांगण्यात आले.
किंमत खूप कमी होणार नाही…
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहे. सध्या, 1620 ते 1820 डॉलर प्रती औंस इतकी किंमत असून ज्यावेळी बाजारपेठ खुली होईल. त्यावेळी सोन्याची किंमत त्या वेळच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर म्हणजेच किमान 44 ते 49 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर सोन्याच्या किमती खूप कमी होतील, असे समजणे चुकीचे असल्याचे सराफांकडून सांगण्यात आले.