चाकण : दीड ते दोन वर्षांपूर्वी मुलीची छेडछाड केल्याने झालेल्या वादातून पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्या कारणावरून तिघांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून करीत तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावाच्या हद्दीत थोपटवाडी कालव्याच्या दरडीजवळ घडली.
याप्रकरणी संशयित तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटीलबुवा कोळेकर, अक्षय किसन कोळेकर, सुनील महादेव कोळेकर (सर्व रा. थोपटेवाडी, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर मयत मुलीच्या मामाने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीड ते दोन वर्षांपूर्वी आरोपींनी फिर्यादी यांच्या भाचीची छेड काढली होती. त्यावरून त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाची तक्रार मयत मुलगी आणि तिच्या पालकांनी चाकण पोलिसांत केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमास संबंधित मुलीला आसखेड खुर्द गावच्या हद्दीत कालव्याच्या दरडीजवळ नेऊन तिच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर कठीण वस्तूने मारून गंभीर जखमी केले. त्यातच तिचा मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह कलाव्याजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखालील झुडुपात विवस्त्र अवस्थेत टाकून दिला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस करीत आहेत.