किव्ह – रशियाच्या फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हच्या परिसरातून माघार घेतल्यानंतर या शहराच्या परिसरात स्थानिक नागरिकांचे 900 मृतदेह आढळून आले आहेत. या सर्वांना रशियाच्या सैनिकांनी गोळ्या घालून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी किव्हवर क्षेपणास्त्रांचे हल्ले अधिक तीव्र करायचे सूतोवाच केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
रशियाने आता युक्रेनच्या पूर्व भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय दक्षिणेकडील मारिऊपोल शहरातही दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. तिथे रशियाचे सैनिक मृतदेह पुरून टाकत असल्याचे बघितले गेले आहे. खारकिव्ह शहरामध्ये रशियाच्या तोफांच्या माऱ्यात 7 जण ठार झाले. त्यामध्ये 7 महिन्याच्या एका बाळाचाही समावेश आहे. या माऱ्यात 34 जण जखमी झाले आहेत.
संपूर्ण किव्ह शहरात रस्त्यांवर शेकडो मृतदेह पडल्याचे आढळून आले. त्यापैकी काही तात्पुरते दफन करण्यात आले आहेत, असे स्थानिक पोलीस प्रमुखानी सांगितले.
खेरसोन आणि झापोरिझझिया या शहरांचा काही भाग रशियाच्या सैन्याने बळकावला असल्याचा आरोपही युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी केला आहे. युक्रेनवर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे झेलेन्सकी म्हणाले.
युक्रेनच्या सीमेजवळच्या ब्रॅन्सक या रशियाच्या शहरावर युक्रेनने केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार झाले, तर 100 इमारतींचे नुकसान झाले. त्यानंतर रशियाच्या सैन्याकडून अधिक जोरदार हल्ले केले जाऊ लागले आहेत. रशियाच्या एका क्षेणणास्त्रवाहू युद्धनौकेला आपल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने बुडवल्याचा दावाही युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.