शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील स्थानिक परिसरातील सावरदरी (ता. खेड) येथील एका बड्या उद्योकाचा तर एका मोठ्या कंपनीतील कामगाराचा करोना चाचणी अहवाल शुक्रवारी (दि. 3) रात्री पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती वराळे उपकेंद्राचे डॉ. हरिदास टेकवडे यांनी दिली.
सावरदरी येथील उद्योजक व्यवसायानिमित्त दिवसातून अनेक लोकांच्या संपर्कात येत होते. त्यांना कुठलंही लक्षण नसतानाही त्यांनी एका प्रतिष्ठित खासगी हॉस्पिटलमध्ये करोना तपासणी केली होती. तो अहवाल रात्री पॉझिटिव्ह आल्याने शनिवारी (दि. 4) सकाळी तालुका आरोग्य प्रशासन स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने या उद्योजकाचे राहते घर, कार्यालय व शेजारील दोन इमारती कंटेन्मेंट झोन म्हणून प्रतिबंधीत केले आहे.
तर सावरदरी गावची कमान ते शिवम हॉटेलपर्यंतचा परिसर बफरझोन म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. त्या उद्योजकाच्या घरातील इतर व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ग्रामपंचायत सावरदरी कडून परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.
दरम्यान, सावरदरी हद्दीतील एका मोठ्या कंपनीत कामगाराला करोनाची बाधा झाली असून तो कामगार निगडीमधील रहिवासी आहे. आरोग्य प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन बाधीत व्यक्ती काम करीत असलेला विभाग सील केला असून आवश्यक ती कार्यवाही केली आहे. यावेळी करंजविहीरेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन, डॉ. हरिदास टेकवडे, तलाठी दत्तात्रय केंगले, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे आदि अधिकारी कर्मचारी प्रशासकीय कार्यवाहीत सहभागी होते.