नवी दिल्ली – ऍस्ट्रझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापिठाकडून कोविड-19 विरोधातील प्रयोगिक तत्वावर विकसित करण्यात आलेल्या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक क्षमता उत्पन्न करण्यास सक्षम आहे, असे सीरम इन्स्टिट्युटने म्हटले आहे.
ही लस इम्यूनोजेनिक आणि सुरक्षित सिद्ध केल्याशिवाय मोठ्या प्रमाणात वापरली जाणार नाही. याबाबत आम्ही प्रत्येकाला आश्वासन देऊ इच्छितो, असे सीरम इन्स्टिट्युटने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
ऍस्ट्राझेंकाच्या लसीची चाचणी घेतली जाणाऱ्या चेन्नईस्थित एका उमेदवाराने या लसीचा डोस घेतल्यानंतर आपल्याला मज्जासंस्थेशी आणि मानसशास्त्राशी संबंधित गंभीर विकारांची लक्षणे दिसायला लागल्याचे म्हटले होते. ही प्रायोगिक लस घेतल्यावरच हे विकार उद्भवले असे म्हणून या उमेदवाराने कंपनी आणि अन्य संबंधितांवर 5 कोटी रुपयांची भरपाई मागणारा दावा दाखल केला होता. त्यानंतर हे स्पष्टिकरण देण्यात आले.
चेन्नईतील उमेदवाराबाबतची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण ही स्थिती सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या लसीच्या सेवनामुळे उद्भवलेली नाही. सीरम इन्स्टिट्युटला संबंधित उमेदवाराच्या वैद्यकीय स्थितीबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, असेही सीरम इन्स्टिट्युटने म्हटले आहे.
उत्पादनाशी संबंधित कराराचा भाग म्हणून सीरम इन्स्टिट्युट भारतात ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या चाचण्या घेत आहे. चेन्नईतील उमेदवाराने केलेले आरोप द्वेषयुक्त आणि चुकीच्या धारणांवर आधारलेले आहेत, असे सीरमने काल म्हटले होते.