नवी दिल्ली: पुरातत्व पुरातन वारसा असलेली तब्बल 820 ठिकाणे येत्या उद्या (8 जून) पासून उघडण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पुरातत्व वास्तूतील जी ठिकाणे पुरातन देवस्थाने आहेत, अशी ठिकाणे उघडली जातील, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील 3 हजार पुरातन वास्तूंपैकी धार्मिक पूजास्थान असलेल्या 820 वास्तू उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दिल्लीतील हौज खास, कुतुबमिनार, लाल घुमट आदींचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या आरोग्य विषयक निकषांचे पालन केले जाईल, असेही प्रल्हाद पटेल यांनी सांगितले.
देशभरात 3,691 वास्तू या पुरातन वास्तू म्हणून जतन करण्यात आलेल्या आहेत. देशात करोनाची साथ पसरू लागल्यानंतर 17 मार्चपासून या सर्व वास्तू पर्यटक आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.