मुंबई: राज्यातील हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, सुरुवातीला हॉटस्पॉट बनलेला धारावीचा रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या पाच दिवसात धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावलेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शनिवारी धारावीत केवळ 10 रुग्ण आढळून आले आहेत.
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत करोनाने हातपाय पसरायला सुरू केले. धारावीतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे करोनाला नियंत्रणात ठेवणे कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.
त्यामुळे धारावीत करोनाला आवरणं कठीण झाले होते. अगदी दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण झाले होते. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे. गेले पाच दिवस धारावीत करोना रुग्णाची संख्या घटलेली दिसत आहे. तसेच गेल्या चार दिवस धारावीत नवीन करोनाबाधित रुग्ण 25 किंवा त्याहून कमी आढळत आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात शनिवारी 82 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल महानगरपालिका हद्दीतील 56, पनवेल ग्रामीणमधील 9, उरणमधील 4, खालापूर 1, कर्जत 2, पेण 8, तळामधील 2 रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 45 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.