रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांना अधीक्षकांकडून अवमानकारक भाषा
भोर – येथील उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष तथा भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांना लेखी व तोंडी सूचना करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे, तर आपल्या सोयीनुसार अधीक्षकांनी आज (दि. 7) रुग्ण कल्याण समितीची बैठक बोलावली होती.
या बैठकीस विशाल तनपुरे, सदस्य सारंग शेटे हे उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादीने तत्कालीन सभापती मंगल बोडके यांनी शिफारस केलेले गजानन शेटे हे समितीचे अध्यक्ष येण्यापूर्वीच तेथून निघून गेले होते. सारंग शेटे यांना सभेची नोटीस न देता त्यांना सभेपासून टाळण्याच्या अधीक्षकांनी प्रयत्न केला असतानाही ते सभेस हजर राहिल्याने अधीक्षकांचा पारा चढला होता.
सभा सुरू झाल्यानंतर रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष तथा भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांच्याकडे नियामक मंडळाच्या सदस्यांचा तपशील, नियामक मंडळाचे कार्यकारिणीची माहिती, मागील सभांचे इतिवृत्त, कार्यकारी समितीचे इतिवृत्त, रुग्ण कल्याण समितीचा निधी तपशील, वार्षिक देखभाल निधी आणि संबंधित तसेच भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकनिधीबाबत माहितीची मागणी केली असता रुग्णालय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांनी ती न देता रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष विशिल तनपुरे यांना असभ्य भाषेत व प्रशासकीय शिष्टाचाराचे उल्लंघन करून अपमानित केले. यानंतर विशाल तनपुरे हे रुग्णकल्याण समितीचे सदस्य सारंग शेटे यांसह रुग्णालयाबाहेर पडले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार ही रुग्णकल्याण समितीची बैठक 11 जानेवारी 2020 ला आयोजित केली होती. मात्र, अधीक्षकांच्या आडेलतट्टू भूमिकेमुळे ही सभा न होता रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारी ठरली असून, भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून चौकशी व्हावी, अशी मागणी भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष विशिल तनपुरे यांनी लेखी निवेदनाद्वारे आरोग्य सेवक मंडळाचे उपसंचालक पुणे व खासदार सुप्रिया सुळे यांचेकडे केली आहे. दरम्यान, डॉ. बामणे यांनी तनपुरे यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याचे समजते.