पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीला अखेर सुरूवात झाली आहे. शुक्रवारी (दि. 29) खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर बचाव पक्षाने साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. हत्यचे घटनेच्या तब्बल आठ वर्षांनंतर या प्रकरणाचा खटला अखेर सुरू झाला आहे. विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
अविनाश धवलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर आठवड्यातून एक ते दोन वेळा सदाशिव पेठेतील अमेय अपार्टमेंटमध्ये राहत. त्यांच्या शेजारी धवलभक्त राहतात. या सदनिकेत डॉ. दाभोलकर त्यांच्या वापराच्या काही वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. त्या प्रक्रियेत धवलभक्त हे पंच होते, अशी माहिती, या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. खटल्याची पुढील सुनावणी दि. 13 नोव्हेंबरला होणार आहे, त्यात फिर्यादी असलेले तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नारायण रानगट यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
पोलिसांनी माझ्या समोर सदनिकेत पंचनामा केला होता. त्यातील काही वस्तू मी ओळखू शकतो, असे सांगत धवलभक्त यांनी त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या काही वस्तू ओळखल्या. पुस्तक, डायरी, कपडे असे काही साहित्य त्याचवेळी पोलिसांनी जमा केले होते.
बचाव पक्षाच्या वतीने ऍड. प्रकाश साळशिंगीकर, ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ऍड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी कामकाज पाहिले. ऍड. इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलट तपासणी केली. धवलभक्त यांनी केवळ पंचनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात काय होते याची कल्पना त्यांना नव्हती. तसेच पूर्ण घराचा पंचनामा त्यांच्यासमोर झाला नाही, असा युक्तिवाद ऍड. इचलकरंजीकर यांनी केला.