भोर -भोर संस्थानची स्थापना 1705 मध्ये झाली, तेव्हापासून रामनवमीच्या दिवशी पंतसचिव घराणे रामजन्मोत्सव राजवाड्यात साजरा करते. मात्र, करोनाच्या परर्श्वभूमीवर 300 वर्षांची परंपरा असलेला रामनवमीचा जन्मोत्सव पहिल्यांदाच भोरच्या राजवाड्यात होणार नसल्याने श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासून भोरची जनता वंचित राहणार आहे.
भोरच्या पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव गेल्या 300 वर्षांपासून भोर संस्थानच्या राजवाड्यात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी संपूर्ण जगभर करोना विषाणूने थैमान घातले असल्याने 2 एप्रिलला होणारा रामजन्मोत्सव पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील शिवाजी सोसायटीत होणार असल्याचे भोर संस्थानचे पंतसचिव चिंतामण सदाशिवराव ऊर्फ आबा राचेजे यांचे कुलमुखत्यार आणि भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किसनराव शेटे यांनी सांगितले.
दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने पंतसचिवांचे वडीलघराणे असलेल्या गांडेकर वाड्यात श्री रामचंद्राला अक्षता देऊन उत्सवाची सुरुवात होते. राज सोनार दीक्षित यांच्या घरातून श्री रामचंद्राची मूर्ती विधिवत पालखी मिरवणुकीने राजवाड्यात आणली जाते.त्यानंतर दुपारी 12 वाजता सजवलेल्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून पाळण्याची दोरी पंतसचिवांचे हस्ते ओढण्यात येते, यावेळी पंतसचिवांचे मानकरी, भोर शहर आणि पंचक्रोशीतील शेकडो भाविक फुलांची उधळण करून सुंठवड्याचा प्रसाद घेतात. मात्र, या वर्षी रामजन्मोत्सवावर करोनाचे सावट पसरल्याने भाविकांना श्री रामाचे दर्शन होणार नसल्याने भाविक निराश होणार आहेत.
घराण्यातील मान्यवरांचा सन्मान नाही
या उत्सवाची सांगता हनुमान जयंतीला होते. यावेळी पंतसचिवांकडून तालुक्यातील ऐतिहासिक घराण्यातील मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्याची प्रथा 300 वर्षांपासूनची आहे. यात भोर तालुक्यातील किवतचे दाभाडे, उत्रौली भोरचे शेटे, भोलावडेचे आवाळे, भोरचे भेलके पाटील, कारीचे जेधे, पिसावारेचे बांदल, भुतोंडेचे कंक आदी घराण्यांचा समावेश असतो. मात्र, ही परंपरा यावेळी पहिल्यांदाच खंडित होणार असल्याचे किसनराव शेटे यांनी पंतसचिव आबा राजे यांच्या वतीने सांगितले.