देशपातळीवरील लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर हृतिक रोशनने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपली पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान हिचे आभार मानले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. लॉकडाऊनमुळे सुजैन खान काही दिवस हृतिक रोशनच्या घरी रहायला आली आहे. करोनाचा संसर्ग मुलांना व्हायला नको यासाठी दोघांनी मिळून मुलांची काळजी घ्यावी असा तिचा हेतू आहे.
हृतिक आणि सुजैनला ऋहान आणि ऋधान ही दोन मुले आहेत. 2014 मध्ये हृतिक आणि सुजैन विभक्त झाले. तेंव्हापासून दोन्ही मुले सुजैनबरोबरच आहेत. करोनाच्या साथीमुळे सर्व देशभर लॉकडाऊन असल्यामुळे अर्थात हृतिकदेखील आपल्या मुलांना भेटू शकणार नव्हता. आपल्या मुलांच्या काळजीने त्याला स्वस्थ बसू दिले नसते.
त्यामुळे सुजैन दोन्ही मुलांना घेऊन हृतिकच्या घरीच रहायला आली आहे. करोनामुळे ही स्थिती आणखी किती दिवस राहणार आहे, हे सांगता येऊ शकणार नाही. जर सर्वांनी स्वस्थ रहायचे असेल तर आपणच आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायला पाहिजे, असे हृतिकने म्हटले आहे. सुजैनबरोबरच्या एका सेल्फीबरोबर त्याने सर्वांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.