सौरव गांगुलीचे मुलीच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीने देशभरात एक तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना हिची एक इंस्टाग्राम पोस्टही चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, सौरव गांगुलीने स्वतः सनाच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण देताना, ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगत सनाला अशा मुद्द्यांपासून दूर ठेवा असे आवाहनदेखील त्याने केले आहे.
Please keep Sana out of all this issues .. this post is not true .. she is too young a girl to know about anything in politics
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 18, 2019
यावर स्पष्टीकरण देताना सौरव गांगुलीने ट्विट करुन, ती पोस्ट खोटी आहे…राजकारणाविषयी समजण्यासाठी ती अजून खूप लहान आहे…कृपया सनाला अशा मुद्द्यांपासून दूर ठेवा…,असे आवाहन केले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये सनाने लेखक खुशवंत सिंह यांच्या द एंड आफ इंडिया या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यस्थितीवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. तसेच तिने आपला विरोधही दर्शवला आहे. आपल्यापैकी ज्यांना वाटतंय की ते मुस्लिम नाहीत त्यामुळे सुरक्षित आहेत ते मुर्खांच्या जगात जगतायेत, अशा आशयाचा संदेश या पोस्टमध्ये आहे. सनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट दिसत नाहीये, पण सोशल मीडियावर पोस्टचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या व्हायरल पोस्टवरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यामुळे सौरव गांगुलीने यावर ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.