ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाल्याची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
कॉनवूड जंक्शन येथील रस्त्याच्या कामापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी दौरा सुरू केला. येथील काम रेंगाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून काम का रेंगाळले याचा संबंधितांकडून खुलासा घ्यावा व खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी तेथील कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी या कंत्राटदाराला तत्काळ ही सामुग्री देण्याबाबत सांगितले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.
यावेळी घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील स्वामी समर्थ मठात भेट देऊन दर्शन घेतले. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण कोरम मॉल येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
सफाई कामगाराशी साधला संवाद
ठाण्यातील नालेसफाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार नगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधून कामाची माहिती घेतली. तसेच येथील रस्त्याच्या कामाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.