मुंबई – अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच या सिनेमाने 200 कोटींच्या क्लबमध्येही एंट्री घेतली आहे. जगभरातून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता लवकरच अदा शर्मा एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.
‘ब्लू व्हेल गेम’वर आधारित ‘द गेम ऑफ गिरगीट’ हा सिनेमा आहे. ‘हेट स्टोरी’ फेम विशाल पांड्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अदा शर्मा पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने याआधी ‘कमांडो’ सिनेमात महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती या भूमिकेत दिसणार आहे.
या नव्या सिनेमात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असून तो यात अॅप डेव्हलपरच्या रोलमध्ये दिसणार आहे. याविषयी तो म्हणाला, “सिनेमाची कथा खूपच लक्षवेधी असून मी यासाठी खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना खासकरून तरुणांना या चित्रपटातून संदेश दिला जाणार आहे.”
दरम्यान, सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच जगभरात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे.