Thackeray on Kangana Ranaut । अभिनेत्री कंगना राणावतला भाजपाने मंडीमधून उमेदवारी दिली आहे. त्यासाठी तिने प्रचाराचा धडाका देखील लावला आहे. मात्र सध्या कंगना तिच्या वक्तव्यावरून वादात अडकली आहे. त्यावरुनच ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून तिच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
सामनात “भारतीय जनता पक्षाच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे किंवा ज्यांच्या अकलेने माती खाल्ली आहे, ज्यांची अक्कल माती खातेय, अशांनाच भाजपमध्ये भवितव्य आहे. कंगना राणावतने भाजपमध्ये प्रवेश करून हिमाचल प्रदेशातून लोकसभेची उमेदवारी मिळवली. कंगनाने आता प्रश्न विचारला की, सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान का केले नाही? ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले, त्यांना गायब का केले? त्यांना भारतात येण्यापासून कोणी रोखले?” असे म्हटले आहे.
तसेच “मुळात कंगनाचा भारतीय इतिहासाशी संबंध आला नाही. कंगनाच्या मते देश स्वतंत्र झाला, तो मोदी पंतप्रधान झाल्यावर. म्हणजे २०१४ साली. त्याआधी हा देश गुलामगिरीत होता व त्या अर्थाने कंगना वगैरे लोक हेच खरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्याबद्दल त्यांना ताम्रपट देऊन बावनकुळ्यांनी तिचा सत्कारच केला पाहिजे”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला.
सुभाषचंद्र बोस कुठे होते? Thackeray on Kangana Ranaut ।
“कंगनाला नेताजी बोस यांच्यासंदर्भात जो प्रश्न पडला आहे, त्याचे उत्तर शाळकरी पोरही देईल. बोस यांचा अपघाती मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला. त्यांच्या अस्थी सप्टेंबर १९४५ ला जपानला पोहोचल्या. बोस यांचे निधन झाले तेव्हा गांधी-नेहरू, सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा शिगेला पोहोचला होता. पण या काळात नेताजी बोस यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बोस कोठे होते? हा प्रश्न निरर्थक आहे”, अशी टीकाही करण्यात आली.
पंतप्रधानांच्या सहवासात कंगनासारखे लाखो ज्ञानी Thackeray on Kangana Ranaut ।
“विश्वगुरूंकडून त्यांच्या चेल्यांना हे असे अर्धवट ज्ञान वाटले जात आहे. ‘ग्यानी’ मोदीजी म्हणतात, ”अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड आया.” मोदींसाठी कोणी हवेत सिमेंटचा रस्ता बांधला काय? पण कितीही जोरदार फेकाफेकी केल्यावर टाळ्या पिटणारे अंधभक्त मिळाल्यावर ‘थापा’ मारण्याची नशा वाढतच जाते. महामारी करोनाही टाळ्या, रस्त्यावर थाळ्या वाजवून पळून जाईल, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांच्या सहवासातच कंगनासारखे लाखो ज्ञानी तयार झाले आहेत”, अशी टीका ठाकरे गटाने केली.