पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या रविवारी (दि.21) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान, याच दिवशी युजीसीच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत सहायक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणारी “नेट’ही होणार आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) “नेट’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 ते 30 नोव्हेंबर व 1 ते 5 डिसेंबरदरम्यान ऑनलाइन विषयनिहाय ही परीक्षा होणार आहे. “टीईटी’च्या परीक्षेच्या दिवशीही काही विषयांसाठी “नेट’ होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने “एनटीए’ला पत्र पाठवून “नेट’च्या वेळापत्रकात बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र “एनटीए’ने वेळापत्रकात बदल केलेला नाही. “टीईटी’साठी पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 16 हजार 381, पेपर क्रमांक 2 साठी 76 हजार 203 तर दोन्ही पेपरसाठी 1 लाख 38 हजार 47 उमेदवारांची नोंदणी झालेली आहे.
आता “टीईटी’ ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. या परीक्षेसाठी 1 हजार 443 परीक्षा केंद्रेही निश्चित केली असून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश पत्रही उपलब्ध झाले आहेत. पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी स्वंतत्र कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
– दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद