कवठे (प्रतिनिधी) – खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवर पलटी झालेला कंटेनर क्रेनच्या सहाय्याने काढत असतानाच भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने चालकाचा ताबा सुटल्याने आठ ते दहा चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपस्थित असलेले महामार्ग पोलीस सुनील विठ्ठल शेलार (वय 52, रा. वाढे खेड, सातारा) यांच्या अंगावर ही वाहने आदळल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी खंबाटकी घाटातील एस कॉर्नर भरधाव वेगात असलेला कंटेनर पलटी झाला. याबाबतची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे एपीआय हणमंत गायकवाड, महिला पीएसआय एस. एन. पवार, संजय धुमाळ, सहाय्यक फौजदार ठाकरे, हवालदार कुंभार हे घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर पलटी झाल्यामुळे घाटात वाहतूक कोंडी होऊ लागली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ क्रेन बोलावून पलटी झालेला कंटेनर काढण्यास सुरुवात केली.
नेमके याचवेळी एस कॉर्नवर एक भरधाव वेगात मालट्रक आला आणि त्याने वाहतूक कोंडीमुळे उभ्या असणाऱ्या आठ ते दहा वाहनांना जोरादार धडक दिली. यावेळी वाहतूक सुरळीत करत असणारे महामार्ग पोलीस सुनील शेलार यांच्या अंगावर ही वाहने आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.
सुदैवाने धडक दिलेल्या वाहनांमधील कोणासही किरकोळ जखम वगळता काही झाले नाही. या अपघातात धडक दिलेल्या आठ ते दहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरु आहे.