पुणे, दि. 22 -रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या 10 ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तर, या कामांच्या देखरेखीची जबाबदारी असलेले 11 उपअभियंता आणि 13 शाखा अभियंत्यांनाही प्रत्येकी 15 हजारांचा दंड करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. पावसाळ्यात सर्वाधिक खराब झालेले 17 रस्ते तीन वर्षे पूर्ण न झालेल्या दोष दायित्व कालावधीतील आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई केलेली आहे. दरम्यान, प्रशासनाने या ठेकेदारांना 1 वर्षासाठी काळ्या यादीत टाकणे तसेच अभियंत्यावर 10 हजारांचा दंड आणि विभागीय चौकशी करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले होते. मात्र, महापालिका आयुक्तांनी त्यात बदल करत वरीलप्रमाणे कारवाईस मान्यता दिली आहे.
139 रस्त्यांची तपासणी
यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची दाणादाण उडविली. यावर्षी प्रशासनाकडून जून महिन्यातही महापालिकेच्या प्रकल्पांच्या नावाखाली शहरात खोदाई सुरूच ठेवली. त्यानंतर लगेचच रस्ते पूर्ववत न करता अनेक रस्त्यांवर थेट डांबरीकरण केले. परिणामी अनेक रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या कालावधीत जवळपास 20 हजारांहून खड्डे पडल्याचे आढळून आले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत खड्डे पडलेल्या रस्त्यांचा दोष दायित्व कालावधी तसेच त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. इंजिनिअर्स इंडिया लि. या संस्थेकडून हे काम करून घेण्यात आले. या संस्थेने 139 रस्त्यांची तपासणी केली. त्यात चार ते पाच रस्त्यांवर खड्डे पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात 17 रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळून आले. तसेच, या रस्त्यांचे काम केल्यानंतर त्यांचा तीन वर्षाचा दोष दायित्व कालावधीही पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे ठेकेदार, संबधित अभियंते यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, अधिक्षक अभियंत्यांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे.
असे आहेत आयुक्तांचे आदेश…
रस्ते खराब झालेल्या ठेकेदारांकडून निविदा रकमेच्या 05 टक्के अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाच्या खर्चाची जी रक्कम जास्त आहे ती दंड म्हणून वसूल करावी ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकावे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांकडून 15 हजार दंड घ्यावा अधीक्षक अभियंत्यांना सक्त ताकीद द्यावी
70 ठेकेदारांना नोटिसा
दरम्यान, रस्त्यावरील खड्डयांप्रकरणी प्रशासनाने आतापर्यंत 70 ठेकेदारांना नोटिसा दिल्या असून, त्यांनी 200 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम केले आहे. त्यातील काही ठेकेदारांचे रस्ते कमी प्रमाणात खराब झाले असून, त्यांनी तातडीने ते दुरुस्त करून दिले आहेत. तसेच त्याचा दंडही प्रशासनास भरलेला आहे. मात्र, कारवाई करण्यात आलेल्या ठेकेदारांचे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत.