पुणे, दि. 22 -रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर वापरण्यास बंदी घातली आहे; पण अजूनही काही रेल्वे गाड्यांमध्ये गॅस सिलिंडर वापरला जात असल्याचे निदर्शनास आले असून, याप्रकरणी रेल्वेच्या पुणे विभागाने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामंध्ये प्रवाशांना जेवण देण्यासाठी पॅन्ट्रीकार उपलब्ध आहे. रेल्वेमध्ये नाष्टा आणि जेवण पुरविण्यासाठी “आयआरसीटीसी’कडून निविदा काढून ठेका दिला जातो. या ठेकेदारांमार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरविले जाते. आगीचे कारण देत रेल्वे बोर्डाने पॅन्ट्रीकारमध्ये 13 जूनपासून गॅस वापरास बंदी घातली आहे. जेवण आणि नाष्टा स्थानकावरील बेसिक किचनमध्ये बनवून प्रवासादरम्यान प्रवाशांना देण्याच्या सूचना बोर्डाने दिल्या आहेत. तसेच रेल्वेमध्ये ते गरम करण्यासाठी इलेक्ट्रीक शेगडी उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. पण अजूनही काही काही रेल्वेमध्ये छुप्या पद्धतीने गॅस वापर केला जात आहे.
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या 11077 झेलम एक्स्प्रेसमध्ये 15 आणि 19 सप्टेंबर रोजी पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये गॅस सिलिंडर आढळून आला. या ठेकेदारांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच यापुढे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची नियमित तपासणी करून यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.
मागील काही दिवसांपासून आम्ही लांब पल्ल्यांच्या गाड्यामधील पॅन्ट्रीकारमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे. आम्हाला तपासणी दरम्यान झेलम एक्स्प्रेसमध्ये गॅस सिलिंडर आढळून आला. आम्ही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.
– मिलिंद हिरवे, वाणिज्य प्रमुख