पालिकेने खरेदी केल्या दहा घंटागाड्या

कचरा निर्मूलनात वाई पालिका स्वयंसिद्ध : ठेकेदाराच्या मनमानीला आळा

वाई –
वाईकरांच्या जिव्हाळ्याचा व जटील असा असणारा घनकचरा निर्मूलनाचा प्रश्‍न पालिका प्रशासनाने अतिशय धाडशी पाऊल टाकून निकाली काढला आहे. वाई नगरपालिकेने शहरातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी दहा घंटागाड्या खरेदी करून वाईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने या प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे वाईकर नागरिकांच्या कचऱ्याच्या समस्या कायमच्या मिटणार आहेत. तसेच ठेकेदाराच्या मनमानी कारभारालासुद्धा यामुळे आळा बसणार आहे. नगरपालिकेचे ठेकेदार संपूर्ण वर्षभरात मुख्य सण, उत्सवाच्या वेळी शहरातील कचरा न उचलता पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याच्या प्रयत्न केला जात होता. मात्र ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराला आता पुरता आळा बसला जाणार आहे, हे मात्र नक्की

तसेच कचरा निर्मूलनाबाबत पालिका स्वयंसिद्ध झाली आहे. तसेच दहा घंटागाड्या खरेदी केल्याने पालिकेला त्यातून उत्पन्नसुद्धा घेता येणार आहे. सध्या शहरातील कचरा वाई नगरपालिका स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोळा करणार असून दोन महिन्यांनी शहरातील कचरा उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व घंटागाड्या ठेकेदाराला भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेने नाशिकच्या ईबी एनव्होपरो या कंपनीला घनकचरा बायो मायनिंगचा ठेका देण्यात आला असून सध्या तो चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या सोनापूर येथील कचरा डेपोत ओल्या व सुक्‍या कचर्ऱ्यावर निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाली आहे.

यामध्ये जुना कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर प्लास्टिक वेगळे, धातू बाजूला करण्यात येवून कुजलेल्या कचऱ्याची माती होवून त्यापासून उत्तम प्रतीचे खत बनविण्यात येणार आहे. त्याचा वापर पालिका सोनापूर येथील शेतीमध्ये वृक्षारोपण करून त्या झाडांना त्या खताचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पालिकेने यापूर्वी अशा पद्धतीचे प्रयोग अनेक वेळा केले हा प्रयोग किती यशस्वी होते ते येणारा काळच ठरविणार आहे. परंतु सध्या तरी ऐन उन्हाळ्यात पालिकेने कचरा निर्मूलनाची सोय केल्याने वाई करांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.