हैदराबाद – केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तेलंगणातील बीआरएस सरकारवर निशाणा साधला आणि त्यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यासोबतच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनाही घेरले. गेल्या 10 वर्षांत चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचाराशिवाय काहीही करू शकले नाहीत, असे गृहमंत्री म्हणाले.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना शहा म्हणाले की, तेलंगणातील जनता 30 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत केसीआर सरकारचा निरोप घेणार आहे. आज तरुण, शेतकरी, दलित आणि मागासवर्गीय लोक पूर्णपणे निराश झाले आहेत. तेलंगणातील जनतेचा असा विश्वास आहे की बीआरएस सरकारने भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.
लोकांना भाजपला मत देण्याचे आवाहन करताना अमित शहा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपली सर्व आश्वासने पूर्ण करते. अयोध्येत राम मंदिर उभारणीपासून ते कलम ३७० हटवण्यापर्यंत आणि तिहेरी तलाक रद्द करण्यापर्यंत सर्व आश्वासने भाजपने पूर्ण केली आहेत.
शहा पुढे म्हणाले की, तुमचे मत केवळ राज्य सरकारचे भवितव्य ठरवणार नाही, तर तेलंगणा आणि देशाचे भवितव्यही त्याच्याशी जोडलेले आहे. सर्व पक्षांचे काम पाहून मतदान करण्याचे आवाहन मी करतो. तुम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारलाच मतदान कराल. भाजपची सत्ता आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल. तसेच भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना तुरुंगात टाकले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली.