मायणीतील खासगी रूग्णालयात तहसीलदारांचा छापा

रेमडेसिवीर संदर्भात रजिस्टरसह अनेक बाबींची तपासणी

वडूज : कोणत्याही रूग्णालयाने रूग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरून आणण्याची चिठ्ठी त्या रुग्णाच्या नातेवाइकांना लिहून देवून नये, असा आदेश असतानाही आणि कोविड रूग्ण दाखल करून घेण्याची परवानगी नसतानाही, ते दाखल करून घेतल्याने मायणीतील एका खासगी हॉस्पिटलवर तहसीलदार किरण जमदाडे यांनी गुरुवारी छापा टाकला. रुग्णालयातील रजिस्टरसह अनेक बाबींची तपासणी जमदाडे यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याबाबत माहिती अशी, मायणीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये परवानगी नसतानाही कोविडचे रूग्ण दाखल करून घेतल्याची आणि रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची नियमबाह्य चिठ्ठी लिहून देत असल्याची तक्रार तालुक्यातील एका सरपंचाने केली होती. या तक्रारीची दखल घेत, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे, डॉ. सुशील तुरकमाने, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी गुरूवारी या हॉस्पिटलमध्ये छापा टाकला.

तहसीदारांनी हॉस्पिटलचे रजिस्टरची तपासून दाखल रुग्णांची पाहणी केली. त्यावेळी 7 कोविड रूग्ण दाखल असल्याचे स्पष्ट झाले.  हॉस्पिटलच्या कचराकुंडीत एक रेमडेसिवीर इंजेक्शनची रिकामी कुपी सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात संबंधितांची चौकशी सुरू होती. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना, खासगी रुग्णालयात या इंजेक्शनची रिकामी कुपी सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.