लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यामुळे डॉक्‍टरलाच मारहाण; बीड जिल्ह्यात पोलिसांचा प्रताप

बीड, दि. 6- अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट असतानादेखील बीड जिल्ह्यात एक धक्‍कादायक प्रकार घडला आहे. आपल्या कर्तव्यावर चाललेल्या एका डॉक्‍टरला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून, बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, कारवाई करत असताना पोलिसांनी चक्‍क वैद्यकीय अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे (वैद्यकीय अधिकारी, गट अ) यांना मारहाण करण्यात आली असल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीमुळे डॉक्‍टर संघटना आक्रमक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.

डॉ. विशाल वनवे यांनी आपले ओळखपत्र पोलिसांना दाखवले. मात्र, तरीसुद्धा पोलिसांनी विशाल वनवे यांना अमानुष मारहाण केली आहे. पोलिसांनी ओळखपत्र दाखवूनसुद्धा दखल न घेता मारहाण केली असल्यामुळे डॉक्‍टर संघटनांनी आता काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. विशाल वनवे हे टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. ते आपल्या ड्युटीवर जात असताना चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी त्यांना रोखले आणि यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.