मुंबई – वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 35.4 षटकांत 188 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 129 अशी होती, त्यानंतर संघाने 59 धावा करताना आठ विकेट गमावल्या . ऑस्ट्रेलियाची 19.3 षटकांत 2 बाद 129 धावसंख्या होती. त्यावेळी मिचेल मार्श आणि मार्नस लबुशेन क्रीजवर होते. रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले आणि त्यानंतर संपूर्ण संघ 35.4 षटकांत गडगडला. म्हणजेच 17 षटकांत भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही.
Innings Break!#TeamIndia bowlers put up a fine show here at the Wankhede Stadium as Australia are all out for 188 runs in 35.4 overs.
Three wickets apiece for Shami and Siraj.
Scorecard – https://t.co/8mvcwAvYkJ #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/S1HkPEPyGl
— BCCI (@BCCI) March 17, 2023
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड पाच धावा करून सिराजचा बळी ठरला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. स्मिथला हार्दिक पांड्याने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. त्याला 22 धावा करता आल्या. यानंतर मार्शने लबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. मार्शला जडेजाने सिराजच्या हाती झेलबाद केले. तो 65 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 81 धावांची धडाकेबाज खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मार्श बाद होताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. लबुशेनला कुलदीपने जडेजाच्या हाती झेलबाद केले. त्याला 15 धावा करता आल्या. यानंतर मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. त्याने तीन षटकांत तीन विकेट घेतल्या. शमीने सर्वात आधी 28 व्या षटकात जोश इंग्लिसला त्रिफळाचित केले. इंग्लिसला 26 धावा करता आल्या. यानंतर 30व्या षटकात कॅमेरून ग्रीनला देखील त्रिफळाचित केले . ग्रीनला 12 धावा करता आल्या. त्यानंतर 32 व्या षटकात मार्कस स्टॉइनिसला स्लिपमध्ये शुभमन गिलकरवी झेलबाद केले. स्टॉइनिस पाच धावा करून बाद झाला.
जडेजाने मॅक्सवेलला हार्दिककडे झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. त्याचवेळी सिराजने शॉन अॅबॉट आणि अॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांत गुंडाळला. शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन, तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.