बंगळुरू – एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत साखळी फेरीपासून अगदी उपांत्यफेरीपर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा नरेंद्र मोदी मैदानावरील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला. त्यावेळी प्रत्यक्षात मैदानात, टीव्ही, ओटीटीवर भारताच्या विजयाचे क्षण साठविण्यासाठी डोळे लावून बसलेल्या करोडो चाहत्यांचे मन तुटले. फायनलनंतर लगेचच सुरू झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका भारताने ३-१ अशी जिंकली असली तरी ‘त्या’ पराभवामुळे तुटलेल्या करोडो भारतीयांची मनांचे काय? हा प्रश्न कायम राहतो.
असे म्हणतात भारतीयांना क्रिकट जरा जास्तीच कळते. त्यामुळेच क्रिकेट हा भारतीयांसाठी आता केवळ खेळ राहिलेला नसून एक भावना बनली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अद्यापही ओल्या असणाऱ्या जखमांवर मालिका विजयाने केवळ हळूवार फुंकर मारली जाणार आहे. अशात उद्या एम.चिन्नास्वामी मैदानावर मालिकेतील अखेरचा टी-२० सामना होत आहे. ज्यात आगामी दक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेऊन श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
भारताला १० सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. अय्यरने एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती परंतु या मालिकेत तो चमकलेला नाही. परंतू काही दिवसांपूर्वी विश्वकरंडकात या मैदानावर त्याने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले होते. अय्यरप्रमाणेच चहरनेही दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर पुनरागमन केले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी त्याला अनुकूल नसेल पण त्याच्या अष्टपैलू गोलंदाजीमुळे चहर यश मिळवू शकतो.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संघ व्यवस्थापन या सामन्यात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरलाही संधी देऊ शकते. वॉशिंग्टनही काही काळ दुखापतींमुळे हैराण आहे. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांनी भारताकडून फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात किशनच्या जागी खेळलेल्या जितेश शर्मानेही आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. गोलंदाजीत रवी बिश्नोईने आतापर्यंत सात विकेट घेत चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. त्याचा संघ विजयासह मालिका संपवून मायदेशी परतण्यास इच्छुक आहे.
टी-२० विजयात भारत अव्वल
भारतीय संघाने टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत विजयी आघाडीसह विक्रमी कामगिरीही केली. याविजयासह आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकूण आपल्या नावे केला. भारताने आतापर्यंत एकूण २१३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी १३६ जिंकले आहेत आणि ६७ गमावले आहेत. तर पाकिस्तानने २२६ पैकी १३५ सामने जिंकले असून ८२ सामने गमावले आहेत.
IPL 2024 : न्यूझीलंडच्या ‘रचिन रवींद्र’ची ‘आयपीएल’ लिलावसाठी Base Prize झाली निश्चित…
संभाव्य संघ :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिष्णोई, अरदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.