India Vs Australia 5th T20I Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरू येथे होणार आहे. येथील केएम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. रविवारी (3 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल.
या मैदानावर आतापर्यंत आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. येथे झालेल्या पाच सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक यश मिळाले आहे. तर ज्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, त्यातील एका सामन्यात केवळ एका धावेने विजय मिळवला आहे. एकूणच या मैदानावर नंतरची फलंदाजी ही विजयाची हमी म्हणता येईल.
टीम इंडियाचा येथे रेकॉर्ड चांगला राहिला नाही. भारतीय संघाने येथे 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याउलट ऑस्ट्रेलियाचा येथे रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या मैदानावर खेळले गेलेले दोन्ही सामने कांगारू संघाने जिंकले आहेत.
हा सामना कुठे बघायचा?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ‘स्पोर्ट्स-18’ आणि ‘कलर्स सिनेप्लेक्स’ टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल. यासोबतच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.
मालिकेत टीम इंडिया 3-1 ने पुढे…
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. म्हणजेच मालिका आधीच टीम इंडियाच्या नावावर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक चेंडू राखून पराभव केला. यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना सहज जिंकला. तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने शतक झळकावत भारताकडून विजय हिसकावून घेतला. त्याचवेळी, चौथ्या सामन्यात टीम इंडियाने पुन्हा एकदा कांगारूंचा सहज पराभव केला.