कोलकाता: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी आज भारतीय संघाची निवड होणार आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निवड समितीचे संकेत आहेत. त्याचबरोबर कसोटीत धावांची बरसात करणाऱ्या मयांक अग्रवालला स्थान मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याही मालिकेतून कमबॅक करणार नाही, असेही संकेत निवड समितीने दिले आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी आज एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.
उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्याचे संकेत निवड समितीने दिले असले तरी रोहित काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यात 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. पुढील वर्षी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
त्यामुळे या मालिकेआधी रोहितला पुरेसा आराम मिळावा यासाठी त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती मिळू शकते. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ 5 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या कामगिरीवर समिती नाखूष असून त्याच्याजागी लोकेश राहुलला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.