India Team for upcoming T20I series vs Afghanistan : बीसीसीआयने रविवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली 14 महिन्यांनंतर सर्वात लहान फॉरमॅटमध्ये परतले आहेत. रोहित पुन्हा T20 संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.
रोहित आणि कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. या दोघांनी काही दिवसापूर्वीच 1 जून ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत आयोजित होणारा टी-20 विश्वचषक 2024 खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. T20 विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान मालिका ही भारताची शेवटची T20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे. त्यापूर्वी या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे तर स्टार फलंदाज विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही खेळताना दिसतील असा अंदाज बांधला जाऊ शकतो. एवढेच नाही तर रोहित पुन्हा एकदा टी-20फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि रुतुराज गायकवाड हे संघात नाहीत. तिघेही दुखापतीतून सावरत आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्यकुमारला पायाला दुखापत झाली होती तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला घोट्याला दुखापत झाली होती. हार्दिक दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतही खेळला नव्हता. त्याचबरोबर फलंदाज रुतुराज गायकवाड बोटाच्या दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. तिघेही आयपीएल 2024 पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतात.
संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. इशान किशनच्या जागी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास व्यक्त केला असून तो बऱ्याच कालावधीनंतर टी-20 संघात परतला आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसाठीही टी-20 संघाचे दरवाजे बंद झाले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजीतही बदल झालेला पाहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी मिळालेली नाही. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंवर आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.
What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024
अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून मोहालीत सुरू होणार आहे. दुसरा सामना इंदूरमध्ये तर तिसरा टी-20सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे.