शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

पिंपरी – गुरुच्या पवित्र पेशाला काळिमा फासत एका वासनांध शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले. निगडी प्राधिकरणातील एका शाळेतील पीटीच्या (शारीरिक शिक्षण) शिक्षकाने शाळेतल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरू होता. याबाबत पीडित मुलाने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडीलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुराग रामदास हिंगे (रा. देहुगाव) या पीटी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अनुराग हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे. जानेवारी महिन्यात त्याने शाळेतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला शाळेतील एका खोलीत बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक अनुराग याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार ज्या शाळेत घडला त्या शाळेची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी अधिक माहीती देण्यात नकार दिला. एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतरही पोलिसांकडून लपवा-छपवी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.