पुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार तसेच समाज कल्याणाच्या 22 योजनांचा फेर आढावा घेण्यात येणार आहे. या योजना सुमारे 15 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आहेत.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी तसेच बेरोजगार युवकांसाठी 22 कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय अनुदान, निकष, तसेच लाभार्थी पात्रता यात कालानुरूप बदल झालेला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही या योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून या योजनांचा आढावा घेण्यात येत असून हे काम आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महिला आणि बालकल्याण समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. यात जास्तीत जास्त गरजूंना या योजनेचा फायदा होईल, अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहेत.