नगर – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षे वेतनश्रेणीचे लाभ प्रशिक्षण न झाल्यामुळे मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने हजारो शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे 12 आणि 24 वर्षे वेतनश्रेणीच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या सर्व शिक्षकांना वेतनश्रेणीचे लाभ सुरु करा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. याबाबत आमदार कपिल पाटील, राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र दिले आहे.
शिक्षण विभागाने दहा दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क भरून राज्यभरातील लाखो शिक्षकांनी नोंदणी केली आहे. परंतु अद्यापी ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. ऑनलाईन नोंदणी करणारा प्रत्येक शिक्षक प्रशिक्षण घेण्यास तयार आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण सुरु होऊ शकले नाही. शिक्षण विभागाची ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची संपूर्ण तयारी ज्यादिवशी पूर्ण होईल त्यादिवशी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. परंतु, शिक्षण विभागाचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू होत नाही म्हणून शिक्षकांनाही वेतन श्रेणीचे लाभ मिळत नाहीत.
===================