पुणे : राज्य शासनाने शाळांना 20 टक्के व 40 टक्के अनुदान जाहीर केले असून यातून शिक्षक, कर्मचारी यांना अद्यापही वेतन मिळालेले नाही. वेतन त्वरित मिळावे यासाठी पुणे विभागातील शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना पत्र दिले आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळावे व पूर्वीच्या अनुदानित शाळेच्या अनुदानासाठी वाढ करावी यामागण्यासाठी शिक्षक, कर्मचारी, संघटना यांनी अनकेदा आंदोलने केली होती. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री यांना बऱ्याचदा निवेदनेही देण्यात आली होती. त्याची दखल घेऊन शाळांना नव्याने 20 टक्के अनुदान जाहीर करण्यात आले. 20 टक्के अनुदान मिळत असलेल्या शाळांच्या अनुदानात 20 टक्के वाढ करुन 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. अनुदान पात्र शाळांची यादीही जाहीर करण्यात आली. त्रुटी असणाऱ्या शाळांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शासनाने अनुदान जाहीर करूनही शिक्षक, कर्मचाऱ्यांना बँक खात्यात वेतन जमा झालेले नाही . ही गंभीर बाब आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलास तपासणीत त्रुटी काढण्यात येत आहेत. या चुकीला शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारीच दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. वेतन बिलाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी व तात्काळ वेतन सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.