पिंपरी – आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. त्यांच्या या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याप्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कार्यकर्ते आपल्या नेत्याचे असे बॅनर लावत आहेत. त्यामुळे ‘भावी मुख्यमंत्री’ व्हायचं कोणी शिल्लकच राहणार नाही’ असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. आज अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असून माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
अजित पवार म्हणाले की, “कार्यकर्ते आपल्या नेत्याचे असे बॅनर लावत असल्याने ‘भावी मुख्यमंत्री’ व्हायचं कोणी शिल्लकच राहणार नाही. कार्यकर्त्यांना मी मागे सांगितले होते की असे बॅनर लावू नका, कारण असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. अशा प्रकारचे बॅनर कोणी लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाहीतर मुख्यमंत्री व्हायचं हे केवळ स्वप्नच राहते.”
यावेळी अजित पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “महाराष्ट्रात वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती किंवा परंपरा नाही. अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष देतो,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, रोहित पवार यांच्याआधी अजित पवार यांच्या वाढदिवसाला देखील कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लावले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा अजित पवार घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट करत चर्चांना पुर्णविराम दिला होता.