पाटणा – बिहारच्या पूर्व चंपारणमधील चिरैयामध्ये शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना चिरैया पोलीस ठाण्याच्या लालबेगिया घाट चौकात घडली. राम बिनय साहनी असे हत्या झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. साहनी हे नाश्ता करून हॉटेलमधून बाहेर पडत असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार गुन्हेगारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. साहनी यांच्या डोक्यात आणि शरीरात चार गोळ्या लागल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहा ते बारा राउंड गोळीबार करण्यात आला.
स्थानिक लोकांनी जखमी शिक्षक राम बिनय साहनी यांना मोतिहारी येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन मोटारसायकलवरून चार गुन्हेगार हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी संधी मिळताच साहनी यांच्यावर गोळ्या झाडल्या. अंदाधुंद गोळीबार करून गुन्हेगार फरार झाले. मृत शिक्षक राम बिनय साहनी यांचे मोठे बंधू लाल बाबू साहनी यांनी सांगितले की, त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून धमक्या येत होत्या. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती.
हत्येची माहिती मिळताच शेजारील गावकऱ्यांनी मोतिहारी ढाका मुख्य रस्ता रोखून धरला. ग्रामस्थांचा रोष पाहता पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. गावकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. घटनास्थळी पोहोचलेले सिकरहाना ढाकाचे उपविभागीय अधिकारी इश्तेखार अहमद यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्याची हत्या ही मोठी घटना असून, यातील गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.