बेंगळुरू – कर्नाटकमध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राज्यातील हुबळी जिल्ह्यात बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि शाळेचा गणवेश परिधान करून परत आल्यावरच तिला पेपरला बसण्याची परवानगी देण्यात आली. याप्रकरणी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर विद्यार्थीनीला कपडे बदलण्यासाठी आणि बुरखा काढण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
एक वरिष्ठ सरकारी अधिकारी धारवाड मोहन कुमार म्हणाले, “ती सिव्हिल ड्रेसमध्ये परीक्षेसाठी आली होती. तिने युनिफॉर्म ड्रेस कोडचे पालन केले नाही आणि बुरखा घातलेला होता. आम्ही तिला आश्वासन दिले की तिला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. त्यानंतर तिने होकार दिला आणि आता ती परीक्षा देत आहे.
त्याचवेळी बागलकोट जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली असून, बुरखा काढण्यास सांगितल्यानंतर विद्यार्थ्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकच्या मंत्र्यांनी सांगितले की, हिजाबबाबत हायकोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे. ज्ञानेंद्र म्हणाले, “नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. आम्ही त्यात तडजोड करणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना हिजाब उतरवून परीक्षा द्यावी लागेल.”
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनीही हीच भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस साहजिकच कारवाई करतील. मला खात्री आहे की, अशा गोष्टींना एकही विद्यार्थी संधी देणार नाही.” त्यांनी विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.
दरम्यान, राज्यभरातील 3,440 केंद्रांमधील 48,000 हून अधिक हॉलमध्ये 8.74 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली आहे. शेवटची परीक्षा 11 एप्रिल रोजी आहे. वृत्तसंस्थेनुसार, काही मुस्लिम मुलींनी निषेधार्थ परीक्षेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
कर्नाटक उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला निर्णय दिला की हिजाब ही एक आवश्यक धार्मिक प्रथा नाही आणि प्रत्येकाने त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांनी निर्धारित केलेल्या ड्रेस कोडचे पालन केले पाहिजे.