कडक कारवाईची मागणी ः गाव बंद पुकारून घेतली निषेध सभा
वाघोली -अष्टापूर (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या तीन शिक्षकांवर उरूळी कांचन येथील तीन तरूणांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अष्टापूर येथे गाव बंद पुकारून निषेध सभा घेण्यात आली. हल्लेखोर तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निषेध सभेला बहुसंख्येने उपस्थित नागरिकांनी केली.
याबाबतीत माहिती अशी की, अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये बुधवारी दुपारी चारच्या सुमारास तीन तरुण विनानंबर दुचाकीवर घिरट्या घालत असल्याचे शिक्षकांना दिसले. शिक्षक व स्थानिक ग्रामस्थांनी तिघांना हटकून पिटाळून लावले. याचाच राग मनात धरून तिघांनी उरूळी कांचनच्या दिशेने जाणाऱ्या शिक्षकांची गाडी भवरापूर येथे अडवून अनिल कुंजीर व इतर दोन शिक्षकांना झाडाची फांदी, विटा, दगडाने मारहाण केली.
हल्ला करून तिघेही फरार झाले. शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. अनिल कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विकास तरंगे, महेंद्र गाडे, सचिन कांबळे या मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकांना मारहाण झाल्याने अष्टापूर येथे गुरुवारी गाव बंदची हाक देण्यात आली. बंद पुकारून निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी अष्टापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्लेखोर तरुणांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली.
हल्लेखोर तरुणांना अटक करून कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाळेमध्ये जनजागृती करण्यासाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून असे प्रसंग कशा प्रकारे हाताळावेत यासाठी पोलीस मार्गदर्शन करतील. विद्यार्थिनींनी देखील त्रास देणाऱ्यांची नावे पोलिसांना कळवावीत. वाईट प्रवृत्तींना वेळीच जाब विचारला तर पुढील प्रसंग टाळता येतील.
प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक लोणीकंद