सासवडमध्ये पोलीस निरीक्षक हाके यांनी साधला संवाद ः “मासूम’चा उपक्रम
वाघापूर – मुलांनी आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला उघडपणे विरोध करून वाचा फोडली पाहिजे. त्याचप्रमाणे गावपातळीवर गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती सदस्य यांनी पालकांची मुलांच्या विविध तक्रारींबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे. मुलांना वाढत्या वयात केवळ सल्ले आणि मार्गदर्शन यांची गरज नसते तर मैत्रीपूर्ण संबंध हवे असतात.
यासाठी पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांना बोलते करावे. त्यांना विश्वासात घेऊन अडीअडचणी ऐकून घ्याव्यात. तरच मुलांच्या मनातील भावना ओळखणे शक्य होईल. यातून अनेक घटनांना पायबंद बसेल, असे प्रतिपादन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) च्या वतीने सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्यांतर्गत “बाल लैंगिक अत्याचार आणि प्रतिबंध’ या विषयावर जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हाके बोलत होते.
हाके यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, मुलांच्या मनातील न्यूनगंड नाहीसा करण्यासाठी त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपावे. त्यांच्यात अपराधाची भावना निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. शाळा, कॉलेजमध्ये याबाबत खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने, महिला दक्षता समिती सदस्या ऍड. कलाताई फडतरे, कुमुदिनी पांढरे, मासूम संस्थेच्या कार्यकर्त्या सुनंदा खेडेकर, मालन झगडे, मंगल कुंजीर, ज्योती चौंडकर, सुरय्या मुलाणी, कविता जगताप, मुस्कान संस्थेचे कार्यकर्ते, प्रशिक्षक दिगंबर, पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, पालक उपस्थित होते.