अनिल देशपांडे
अमेरिकेहून श्रेयाला पेन संच भेट : मंत्री जयंत पाटील, बच्चू कडू यांनी केले अभिनंदन
राहुरी – तालुक्यातील सात्रळ येथील कडू वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रेया गोरक्षनाथ सजन हिने जिल्हा परिषदेतील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सुंदर हस्ताक्षर म्हणजे मोत्याचा दागिना आणि हा दागिना काय कमाल करु शकतो, याचा अनुभव श्रेया सजन सध्या घेत आहे. तिचे हस्ताक्षर व त्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.एकाच दिवसात श्रेयाचे नाव थेट अमेरिकेतही जाऊन पोहोचले. ती लिहीत असतानाचा व्हिडिओ अमेरिकेतील रोहित काळे यांनी पहिला आणि थेट अमेरिकेहून त्यांनी श्रेयाशी संपर्क साधून तिला कॅंलोग्राफी पेनचा संच बक्षीस देऊ केले आहेत.
सोनगाव सात्रळ येथील कडू वस्तीवरील श्रेया गोरक्षनाथ सजन हे नाव अवघ्या दोनच दिवसात एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. ती स्टारच बनली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तिने जिल्हा परिषदेच्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत हस्ताक्षर स्पर्धेत यंदा प्रथमच भाग घेतला. याआधी पहिली व दुसरीत ती शाळा व केंद्रस्तरावरील टप्पा गाठू शकली होती. तिचे वडील शिक्षक गोरक्षनाथ सजन यांनी तिच्यातील हा विशेष गुण हेरला. अमित भोरकडे, मंगळवेढा येथील कला शिक्षक यांचे मार्गदर्शन व्हिडिओद्वारे श्रेयाला दिले आणि त्या मार्गदर्शनामुळे तिच्या हस्ताक्षराला एक वेगळेच तेज प्राप्त झाले. तिच्या हस्ताक्षराचा फोटो वडील सजन सोशल मीडियावर टाकण्यात आला, तेव्हा अनेकांना हे इयत्ता तिसरीतील मुलीच्या हस्ताक्षर वाटलेच नाही.
मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, हा व्हॉट्सऍप ग्रुपचे 65 हजार सदस्य आहेत. हे अविश्वसनीय आहे. हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. अशा अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या पाहून ती लिहीत असतानाच व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात आला. तो व्हिडीओ तेथे गेल्यानंतर स्टार मराठीने व्हिडीओ अपलोड केला आणि क्षणभरात हजारोंच्या संख्येने श्रेयाला, त्या व्हिडिओला लाखाच्यावर लाईक मिळाले. त्याची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रेयाशी संपर्क साधून तिचे विशेष अभिनंदन केले.
पहिल्या दोन इयत्तेत विविध स्पर्धांमध्ये यात प्रामुख्याने चित्रकला, रंगभरण, भाषण स्पर्धा, हस्ताक्षर तसेच राज्यस्तरीय स्पर्धा, नॅंशनल टॅंलेंट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. चित्रकला चांगली असल्यामुळे व योग्य मार्गदर्शन व हस्ताक्षरावर घेतलेली मेहनतीमुळे स्पर्धेत हे यश मिळवता आल्याचे श्रेया सजन हिने सांगितले.तिने हे अक्षर कॅलिग्राफीपेनने लिहीलेले आहे.वर्ग शिक्षक राजेंद्र शिंदे, मुख्याध्यापिका इंदुमती व्यवहारे, वडील गोरक्षनाथ सजन व आई मनिषा सजन व शाळेतील शिक्षकांचे हस्ताक्षर स्पर्धेत मार्गदर्शन मिळाल्याचे श्रेया सजन हिने सांगितले.