पुणे – वाहनांचा टॅक्स थकविणाऱ्यांवर आता “आरटीओ’कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या थकित वाहनांची तपासणी दिवाळीनंतर करून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच, शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या तपासणी मोहिमेत वाहनांची पियुसी आणि फिटनेस तपासणीही करण्यात येणार आहे.
शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये दुचाकीपासून, कार, मालवाहतूक व प्रवाशी वाहतुक करणारे ट्रक, बस यांचा समावेश आहे. दसरा आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होते. पुण्यातील वाहनांची संख्या अधिक आणि रस्ते अपुरे अशी परिस्थिती असतानाही यंदाच्या दसरा-दिवाळीत अवघ्या वीस दिवसांत 20 हजार वाहनांची खरेदी झाली आहे. त्याचबरोबर आता ई-बाइकची संख्याही वाढत आहे.
दरम्यान, वाहन खरेदीनंतर मालवाहतूक वाहनांना ठराविक कालावधीनंतर कर भरणे आवश्यक आहे. तसेच वाहनांचे आयुर्मान संपल्यानंतर आरटीओकडे वाहनाची फिटनेस तपासणी आणि कर भरून पुढील परवानगी दिली जाते. मात्र, शहरात अनेक व्यक्ती हा कर न भरता वाहन चालवितात. त्यामुळे या करबुडव्या वाहन मालकांविरोधात आरटीओने कारवाईचा बडगा उगारला आहे.
“थकीत कर असलेल्या वाहनांची तपासणी आणि कारवाईसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहे. त्यानुसार दिवाळीनंतर कार्यक्षेत्रातील सर्व वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.” – संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे