पिंपरी, (प्रतिनिधी) – जप्त केलेल्या वाहनांचा ई-लिलाव केल्याने एकाच दिवसात पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या खात्यात सुमारे ३९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ११ वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. नुकतीच ई-लिलावाची कार्यवाही आरटीओकडून करण्यात आली होती.
आरटीकडून दरवर्षी जप्त केलेल्या वाहनांचा ई-लिलाव केला जातो. यंदाच्या वर्षीही जाहिर ई-लिलावाची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये कर न भरलेली व गुन्ह्यात अटकावून ठेवलेली १३ वाहने ई- लिलावासाठी उपलब्ध होती. यामध्ये बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश होता.
या वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा करण्याबाबत आरटीओकडून वारंवार मुदत वाढवून दिली होती. मात्र त्याकडे संबंधीत मालकांनी कानाडोळा केला होता. त्यानंतर या वाहनांचा ई-लिलाव करण्याबाबत आरटीओकडून जाहिर करण्यात आले. त्यानुसार या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई- लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी ११ वाहनांना ऑनलाईन बोली प्राप्त झाली व त्यानुसार महसूल प्राप्त झाला आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत जाहीर ई-लिलावाद्वारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय महसूल वसूल करण्याची कार्यवाही केली आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीकरीता यापुढेही ई-लिलाव केले जातील, याची नोंद घेऊन थकीत मोटार वाहन कर भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.