विजेचा लपंडाव; फटाक्यांच्या आतषबाजीत आसमंत न्हाऊन
नगर – सनईचे मंगलदायी सूर, दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पाना-फुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदिलांचा प्रकाश, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात आज (रविवार) सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन झाले. यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खातेपुस्तिकांची पूजा झाली अन् त्यानंतर मुक्तहस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला. गेल्या दोन ते तीन दिवसापासून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असून बहुतांश ठिकाणी दिवाळी अंधारात साजरी करावी लागली.
पहाटेच्या अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटल्यावर नागरिकांनी प्रियजनांसोबत गप्पाष्टक रंगविले. बागा, हॉटेल्स, मिसळींची दुकाने अन् चहाच्या ठेल्यांवर रसनातृप्ती झाल्यानंतर अनेकांनी वामकुक्षीला प्राधान्य दिले. काहींनी सकाळीच शहरातील बाजारपेठा गाठून लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य, तसेच गोड-धोड खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. पूजेच्या साहित्यासह कपडे, मिठाई, सोन्याचे दागिने, वाहन व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ फुलली होती.
माळीवाडा, चितळे रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकवीरा चौक, केडगाव वेस या ठिकाणी पूजेच्या साहित्यासह रांगोळी आदी दुकानांमध्ये चांगलीच गर्दी होती. केडगाव वेस येथे नगर-पुणे महामार्गावरच काहींनी फुलांची दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी 9पासून बाजारात खरेदीसाठी मोठी वर्दळ दिसत होती. माळीवाड्यासह दिल्लीगेट व बालिकाश्रम रस्त्यावर विक्रेत्यांनी रस्त्याच्या मधोमध दुकाने थाटल्याने वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना कोंडीचा सामना करावा लागला.
सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. शहर-उपनगरातील दुकानेही आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजनानंतर फराळावर आडवा हात मारत पेटपूजेचा फक्कड बेत जमून आला होता.
शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजविण्यास प्राधान्य दिले. दुकानांपुढे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मुहूर्ताची वेळ जसजशी जवळ येत होती, तशी व्यापारी-कर्मचाऱ्यांची पूजेची लगबग वाढत होती.
लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची साग्रसंगीत पूजा पार पडली. यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले. पूजाविधीनंतर गूळ, लाह्या, बत्ताशासह मिठाईचे वाटप करत व्यापाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् फटाक्यांची मनमुराद आतषबाजी केली.