मुंबई : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दुसरीकडे विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपही जोरदार तयारीला लागला आहे. अशातच राष्ट्रपती निवडणुकीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपशी संवाद होऊ शकतो असे म्हंटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या अयोध्येत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने कधीच खालच्या पातळीचे राजकारण केले नाही. राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने सदैव दरवाजे उघडे ठेवले आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठवरण्यासाठी शिवसेनेचा भाजपशी संवाद होऊ शकतो. भाजपसाठी शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. आता राऊत यांच्या या विधानावर भाजपकडून कशी प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
म्हणून राहुल गांधींची चौकशी
सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्यावरूनही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून अशा प्रकराची कारवाई सुरु आहे. ही तर २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलीये.