कात्रज – धनकवडी गाव परिसरातील मोहननगर भागातून आंबेगाव पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज संध्याकाळी तळीरामांचा मुक्त संचार असल्याने महिला व किशोरवयीन मुली यांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.
मोहननगर परिसरात राजरोसपणे हातभट्टी दारू विक्रीचे धंदे सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाकडून त्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे धनकवडी परिसरामध्ये खडकवासला मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असताना पतितपावन संघटनेमार्फत गेल्या दीड वर्षांपासून अवैद्य दारू धंदे बंद करण्यासाठी लढा सुरू आहे. मोहननगर परिसरातील स्थिती लक्षात घेता पोलिसांनीही या विरोधात कठोर पावले उचलावीत प्रतिबंधित उपाय योजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैद्य दारू धंदे सुरू नाहीत. सर्व धंदे बंद करण्यात आले आहे. जर कोणालाही अशी माहिती मिळाली तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्याचे नाव गुपित ठेऊन अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येईल. – स्वाती देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गेल्या दीड वर्षांपासून या अवैध धंद्या विरोधात आंदोलने केली. पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार निवेदनेही दिली. मात्र अजूनही याबाबतीत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. महिला भगिनी शहीद पतित-पवन संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येणार आहे.
– विजय क्षीरसागर, अध्यक्ष, धनकवडी पतित पावन संघटना