सातारा -दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार नावावर झालेल्या जमिनीची फेरफारमध्ये नोंदणी करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना शेनवडी, ता. माण येथील तलाठी तुकाराम शामराव नरळे (वय 36, रा. पानवण, ता. माण) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. म्हसवड रस्त्यावरील ढोर कारखान्यासमोर शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, पानवण येथील तलाठी तुकाराम नरळे याच्याकडे वडजल सजाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदाराच्या चुलत सासऱ्याची शेनवडी, ता. माण येथील साडेतेरा एकर जमीन तक्रारदाराचे पती आणि दीर यांच्या नावावर करण्याचा आदेश 20 जुलै रोजी दिला होता.
या आदेशानुसार संबंधित जमिनीच्या फेरफारवर नोंद करण्यासाठी नरळे याने तक्रारदाराकडे 11 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या सातारच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर उज्ज्वल वैद्य, हवालदार नीलेश चव्हाण, प्रशांत नलावडे, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी शुक्रवारी दुपारी म्हसवड रस्त्यावरील ढोर कारखान्यासमोर सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून नऊ हजार रुपये लाच घेताना तुकाराम नरळे याला पकडण्यात आले.