पिंपरी – शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करणे हे महापालिकेने उदिष्ट ठेवले आहे. प्रशस्त रस्ते हे त्या शहराची ओळख असते. मात्र, रस्ते विकसित करण्याच्या नावाखाली 6 ते 8फुटांचे पदपथ विकसित करण्यात येणार आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या काही भागांतील पदपथ विकसित केले आहेत. त्या भागात रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. अशातच आता शहरातील आणखी पाच रस्त्यांवरील फूटपाथ अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित केले जाणार आहेत. महापालिका पिंपरी-चिंचवडकरांचे तब्बल दोनशे कोटी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवडकरांना रोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास देणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरूंद करण्यावर महापालिकेचा भर दिसत आहे. तसेच शहरात पार्किंग पॉलिसीचेही तीन-तेरा वाजले आहेत. त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवर सकाळ आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यापूर्वीच महापालिकेने अर्बन स्केपिंग डिझाइननुसार नागरिकांसाठी तसेच लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक उभारले आहेत. रस्ते अरूंद झाले आहेत. आता पुन्हा 6 ते 8 फूट पदपथ विकसित केले जाणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक, आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत फूटपाथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. यापैकी बहुतेक मार्गांवर आधीच बीआरटी कॅरिडोरमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. रस्ते अर्बन स्ट्रीट नुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. यापूर्वीच महापालिकेने बहुतांशी रस्त्यांवर कोट्यावधी रूपये खर्च करून फूटपाथवर गट्टू बसविले आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल 109 कोटींचा खर्च
पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी, मेट्रोमुळे अगोदरच रस्ता अरूंद झाला आहे. अशा परिस्थितीत महामार्गावर दोन्ही बाजूला पार्किंग तळाची सुविधा नसल्याने ठिकठिकाणी वाहने पार्क केली जातात. दापोडीतील हॅरिस पुल ते निगडी भक्ती शक्ती या मार्गावर दोन्ही बाजूला पदपथ विकसित केले जाणार आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात दापोडीतून पिंपरीपर्यंत दोन्ही बाजूला पदपथ विकसित केला जाणार आहे. तर पिंपरी ते भक्तीशक्तीकडे जाणाऱ्या महामार्गाच्या डाव्या बाजूचा पदपथ विकसित केला जाणार आहे. त्यानंतर मेट्रोचे काम होताच पिंपरी ते निगडीपर्यंत उजव्या बाजूचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुरुवातीच्याच कामासाठी तब्बल 109 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
इकडेही लक्ष द्यावे लागेल
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात भले मोठे पदपथ बनविण्यात आले. या पदपथांवरुन चालणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. परंतु एमके चौक ते पिंपळे गुरवकडे जाणारा रस्ता, जगताप डेयरी ते सांगवी फाटा या रस्त्यांवर पूर्वी कधीच वाहतूक कोंडी होत नव्हती. परंतु मोठे पदपथ बनविल्यानंतर येथील वाहतूक मंदावली आहे. पिंपळे गुरवमध्ये बहुतेक वाहनेही रस्त्यावरच पार्क केली जातात हे माहीत असतानाही मोठे पदपथ बनविले आणि आता पार्किंग रस्त्यावर होत असल्याने वाहतुकीसाठी अर्धा रस्ता देखील उरत नाही. वाहनांची संख्या, पार्किंगची व्यवस्था या सर्व बाबींकडे लक्ष देऊन मोठे पदपथ बनविण्याबाबत विचार होणे गरजेचे होते.
अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या पाच रस्त्यांवर प्रामुख्याने तीन मीटरची एक लेन अशा पध्दतीच्या दोन लेन आहेत. त्यामुळे फूटपाथ विकसित केल्यास वाहतुकीला अडथळा येणार नसून जिथे जेवढी जागा असेल तेवढ्याच जागेच पदपथ विकसित करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक पध्दतीचे पदपथ करून नागरिकांना बसण्यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या आणि रस्त्यांच्या सौदर्यांत भर पडणार आहे.
प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता